Uncategorized

अशोकराव आता नांदेड भूषण…! धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांच्या आग्रहाखातर अशोकराव चव्हाण नांदेड भूषण पुरस्कार स्विकारणार

 

नांदेड (डॉ.प्रदीप राजपूत)

माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांना त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक,प्रशासकीय व सामाजिक योगदानाबद्दल पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष २०२६ चा मानाचा “नांदेड भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी कै.चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी,नवा मोंढा मैदान,नांदेड येथे होणाऱ्या “नरेंद्र–देवेंद्र महोत्सव”या दोन दिवसीय काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी,संयोजक धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांनी केली आहे.

अशोकराव चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संमती दिल्यामुळे “नांदेड भूषण” पुरस्काराची उंची आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, नांदेड भूषण पुरस्काराचा पहिला मान ज्येष्ठ पत्रकार सुधाकराव डोईफोडे यांना देण्यात आला होता. दुसऱ्या पुरस्कारासाठी सन २००० साली अशोकराव चव्हाण यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती; मात्र विचारधारा वेगळी असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. यावेळी संयोजक धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी खास आग्रह धरल्याने अशोकराव चव्हाण पुरस्कार स्वीकारण्यास तयार झाले, हे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ११,०००, स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे आहे.

अशोकराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास अत्यंत व्यापक व प्रभावी राहिला आहे. ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असून, त्यांनी चार वेळा आमदार, दोन वेळा खासदार (लोकसभा), एक वेळा विधानपरिषदेचे सदस्य तसेच राज्यसभेचे खासदार म्हणून काम केले आहे.

सन १९८५ मध्ये संजय गांधी निराधार योजना, नांदेड शहरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. १९८७ ते १९८९ या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. १९९२ मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून आले. १९९३ मध्ये त्यांचा महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम, नगरविकास व गृह विभागाचे राज्यमंत्री म्हणून समावेश झाला.

१९९९ पासून मुदखेड व भोकर मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व केले. महसूल, परिवहन, उद्योग, सांस्कृतिक कार्य, खाणी, प्रोटोकॉल अशा महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या.

८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९ आणि ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१० या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले. २०१४ मध्ये ते पुन्हा नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. २० फेब्रुवारी २०२४ रोजी ते महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून गेले.

राजकीय कारकिर्दीबरोबरच नांदेडच्या सांस्कृतिक, क्रीडा व विकासात्मक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. देशभरात “अशोकराव यांचे नांदेड” अशी शहराची ओळख निर्माण झाली आहे.

सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ, प्रभावी व प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे अशोकराव चव्हाण यांना वर्ष २०२६ चा “नांदेड भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात येत असून,त्यांच्या संमतीमुळे या पुरस्काराच्या प्रतिष्ठेत भर पडल्याची भावना नांदेडकरांत व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!