पावसाच्या खंड काळात पीक व्यवस्थावन व उपाययोजना
उपलब्ध ओलावा,पाणी व चाऱ्याचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन..!

कंधार-नांदेड (डॉ.प्रदीप राजपूत)
नांदेड जिल्ह्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड तसेच बदलत्या हवामान परिस्थितीमुळे पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन त्याचा पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर तसेच पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाच्या खंड काळात उपलब्ध जमिनीतील ओलावा, पाणी, अन्नद्रव्ये आणि चारा यांचे काटकसरीने व कार्यक्षम व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे
पिकांची वाढीची अवस्था, पानांची स्थिती, मुळांच्या परिसरातील ओलावा तसेच पिकांमध्ये पाण्याच्या ताणाची लक्षणे यांचे नियमित निरीक्षण करावे. हलकी, मध्यम आणि भारी जमीन यामध्ये उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण वेगवेगळे असल्याने सर्व शेतांसाठी एकसारखी उपाययोजना न करता जमिनीचा प्रकार व पिकाची अवस्था विचारात घ्यावी. सकाळच्या वेळी पाने कोमेजणे, पानांचा रंग बदलणे अथवा पिकांची वाढ मंदावणे यासारखी लक्षणे आढळल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक उपाययोजना करावी.
*उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संरक्षित सिंचनास प्राधान्य*
सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करावा. संपूर्ण क्षेत्राला कमी प्रमाणात पाणी देण्यापेक्षा पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत संरक्षित सिंचनास प्राधान्य द्यावे. विशेषतः फुलोरा, शेंगा अथवा बोंडांची निर्मिती, दाणे भरणे आणि फळवाढ या अवस्थेत आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन दिल्यास पिकांना पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ठिबक व तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम पद्धतींचा वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्रासाठी उपयोग करावा.
*पावसाचे पाणी शेतात अडवून जमिनीत मुरवावे*
पावसाच्या खंडानंतर होणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असल्याने पावसाचे पाणी शेताबाहेर वाहून न जाता जास्तीत जास्त जमिनीत मुरेल, यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात. विशेषतः कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सऱ्या काढून पावसाचे पाणी अडवावे. परिस्थितीनुसार सरी-वरंबा, समतल आडव्या सऱ्या, बांधबंदिस्ती, शेततळे आदी उपायांचा अवलंब करावा. “पावसाचा प्रत्येक थेंब शेताच्या बांधात व जमिनीच्या पोटात” या दृष्टिकोनातून जलसंधारण करावे.
*तण नियंत्रण व आंतरमशागतीकडे विशेष लक्ष द्यावे*
पावसाच्या खंड काळात तणेही जमिनीतील उपलब्ध पाणी व अन्नद्रव्यांसाठी पिकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रणाला विशेष महत्त्व आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आंतरमशागत, खुरपणी किंवा शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा. तणांचे वेळीच नियंत्रण केल्यास जमिनीतील उपलब्ध ओलावा पिकांना अधिक काळ उपलब्ध राहण्यास मदत होते.
पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी आंतरमशागत करावी. जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या भेगा बुजविल्यास बाष्पीभवनामुळे होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी होतो. आंतरमशागत करताना पिकांच्या मुळांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.*कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन करावे*
पावसाच्या खंड काळात पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा पिकांची पाहणी करून किडींची संख्या, रोगांची लक्षणे आणि प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी. शक्य तेथे जैविक निविष्ठा, जैविक नियंत्रण, पक्षीथांबे, चिकट सापळे व कामगंध सापळे यांचा वापर करावा.
कीड आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यानंतरच संबंधित पिकासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. अनावश्यक व अवाजवी कीटकनाशकांच्या फवारण्या टाळाव्यात.*आच्छादनाद्वारे जमिनीतील ओलावा टिकवावा*
पिकांच्या ओळींमध्ये उपलब्ध पीक अवशेष, कडबा, गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन केल्यास जमिनीच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते. आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास, तणांची वाढ कमी होण्यास तसेच कालांतराने जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्धतेनुसार सेंद्रिय खते व जैविक निविष्ठांचा वापर करावा.
*पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे*
पावसाच्या खंड काळात जमिनीतील ओलावा कमी असल्याने मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण कमी होऊ शकते. त्यामुळे पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. आवश्यकतेनुसार पोटॅशियम नायट्रेट १ ते २ टक्के किंवा ००:५०:३४ चे १ टक्का द्रावण यांची फवारणी ८ ते १० दिवसांच्या अंतराने करण्याची शिफारस करता येते. यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ शकते.
मात्र, अन्नद्रव्यांची निवड, मात्रा व फवारणीची वेळ निश्चित करताना पिकाची अवस्था, उपलब्ध ओलावा व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदी जैविक निविष्ठांचा वापर केल्यास जैविक व अजैविक ताण सहन करण्यास पिकांना मदत होऊ शकते.*पशुधनासाठी चारा नियोजन करावे*
पावसाच्या खंडाचा परिणाम पिकांसोबतच पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या हिरव्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाणी व क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचे नियोजन करावे. शक्य असल्यास ज्वारी, मका, बाजरी, चारा गवत, बरसीम, लुसर्न तसेच स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा पिकांची निवड करावी. चारा पिकांची निवड करताना पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि पशुधनाची संख्या विचारात घ्यावी.
उपलब्ध हिरवा चारा योग्य अवस्थेत कापून वाळवून वाळलेला चारा (हे) तयार करणे किंवा योग्य पद्धतीने मुरघास तयार करून साठवणे उपयुक्त ठरते. यामुळे पुढील पावसाच्या खंड काळात चाऱ्याची उपलब्धता राखता येते.*उपलब्ध चाऱ्याचा पौष्टिक व कार्यक्षम वापर करावा*
चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्यास उपलब्ध चाऱ्याचा अपव्यय टाळून त्याचा पौष्टिक व कार्यक्षम वापर करावा. कडबा किंवा वाळलेल्या चाऱ्याची योग्य आकाराची कुट्टी केल्यास अपव्यय कमी होऊन पशुधनाला चारा खाणे सुलभ होते. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कडधान्यवर्गीय चारा यांचे संतुलित मिश्रण करावे.
गरजेनुसार पशुवैद्यकीय अथवा पशुपोषण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खनिज मिश्रण व आवश्यक पूरक खाद्य द्यावे. कमी पौष्टिक कडब्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया किंवा इतर चारा प्रक्रिया पद्धतींचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चारा पावसापासून सुरक्षित, कोरड्या व हवेशीर ठिकाणी साठवावा.*फळबागांमध्ये विशेष पीक व्यवस्थापन करावे*
पावसाच्या खंड काळात फळबागेतील झाडांवर पाण्याचा ताण येण्याची शक्यता अधिक असल्याने झाडांची व जमिनीतील ओलाव्याची नियमित पाहणी करावी. उपलब्ध असल्यास ठिबक सिंचनाचा कार्यक्षम वापर करून झाडांच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात आवश्यक तेवढेच पाणी द्यावे. शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी सिंचन करावे. तीव्र उष्णतेच्या काळात सिंचन टाळावे.
फळझाडांच्या आळ्यात पीक अवशेष, वाळलेले गवत, कडबा किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. मात्र, आच्छादन थेट झाडाच्या बुंध्याला चिकटून ठेवू नये. त्यामुळे बुंध्याजवळ जास्त आर्द्रता निर्माण होऊन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
पावसातील खंडानंतर आर्द्रता व तापमानातील बदलांमुळे काही रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे फळझाडांची नियमित पाहणी करावी. सुकलेल्या व रोगग्रस्त फांद्या आणि पाने काढून नष्ट करावीत. छाटणीच्या किंवा खोडावरील जखमांवर तसेच संबंधित बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असलेल्या भागावर कृषी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार योग्य प्रमाणात बोर्डोपेस्टचा वापर करावा. अनावश्यक रासायनिक फवारण्या टाळून एकात्मिक रोग व्यवस्थापनास प्राधान्य द्यावे.*फळबागेत अन्नद्रव्य व्यवस्थापन करून झाडांवरील ताण कमी करावा*
पाण्याचा ताण असताना जास्त प्रमाणात रासायनिक खते जमिनीत देणे टाळावे. झाडांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि अपेक्षित उत्पादन लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. आवश्यकतेनुसार व तज्ज्ञांच्या सल्ल्याने पर्णीय अन्नद्रव्यांची फवारणी करता येते. मात्र, पाण्याचा तीव्र ताण किंवा अतिउष्णतेची परिस्थिती असल्यास फवारणी न करता योग्य वेळ निवडावी.
*पुढील पावसासाठी शेत सज्ज ठेवावे*
पावसाचा खंड संपल्यानंतर कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. शेतातील बांध मजबूत करावेत. जलसंधारणाच्या सऱ्या, चर, शेततळे तसेच इतर जलसंधारणाच्या रचना सुस्थितीत ठेवाव्यात. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल, यासाठी योग्य नियोजन करावे.
*पिकांची अवस्था व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच उपाययोजना करा*
पावसाच्या खंड काळात कोणतीही एकच उपाययोजना सर्व पिकांसाठी किंवा सर्व शेतांसाठी लागू होत नाही. पिकाची वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, सिंचनाची उपलब्धता, पिकाची सद्यस्थिती आणि स्थानिक हवामान परिस्थिती यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.
विशेषतः अन्नद्रव्यांची फवारणी, कीटकनाशके, बुरशीनाशके, जैविक निविष्ठा, बोर्डोपेस्ट तसेच चारा प्रक्रिया यांचा वापर संबंधित पिकासाठी शिफारशीत पद्धतीने आणि कृषी अथवा पशुसंवर्धन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावा.
पावसाचा खंड म्हणजे केवळ संकट नव्हे; योग्य नियोजन, उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन, काटकसरीचे सिंचन, जलसंधारण, पीक संरक्षण, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पशुधनासाठी चारा नियोजन यांच्या माध्यमातून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करावे आणि पिके व पशुधनाचे शाश्वत व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.