Uncategorized

नांदेड जिल्ह्यात ३० जानेवारी पासून ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान..! २०२६ पर्यंत कुष्ठरोग निर्मूलन करण्याचा आरोग्य विभागाचा निर्धार.

नांदेड (डॉ.प्रदीप राजपूत)

कुष्ठरोग निर्मूलनासाठी आणि समाजात या आजाराबद्दल असलेली भीती व भेदभाव दूर करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे.

  या संदर्भात नुकतीच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक संपन्न झाली यावेळी आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ.बालन यांनी अभियानाचे स्वरूप स्पष्ट केले सन २०२६ पर्यंत जिल्ह्याला कुष्ठरोगमुक्त करण्याच्या दृष्टीने सर्वांनी मिशन मोडवर काम करावे,असे आवाहन त्यांनी केले,अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये व उपक्रम खालील प्रमाणे आहेत

कुष्ठरोग प्रतिज्ञा (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, शाळा आणि शासकीय कार्यालयांमध्ये कुष्ठरोग निवारणाची प्रतिज्ञा घेतली जाईल. तसेच या आजाराविषयीची शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती केली जाईल.

सर्वेक्षण आणि तपासणी: अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाईल. संशयित रुग्णांची शोधमोहीम राबवून त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून दिले जातील.

भेदभाव निर्मूलन:
“कुष्ठरुग्णांशी भेदभाव टाळा, त्यांना सन्मानाने वागणूक द्या” या मुख्य उद्देशावर हे अभियान आधारित आहे.

प्रतिबंधात्मक उपचार:
कुष्ठरुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना संसर्ग टाळण्यासाठी रिफॅम्पिसिन या गोळीचा एक डोस देण्यात येणार आहे,या अभियानामध्ये वीटभट्टी,बांधकाम मजूर,तांडे आणि दुर्गम भागातील वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
जिल्हयातील सर्व नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे आणि कुष्ठरोगमुक्त नांदेडसाठी आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके, सहाय्यक संचालक कुष्ठरोग आरोग्यसेवा डॉ.बालन आरोग्य विभाग यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

बैठकीला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी, क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड,माता बाल संगोपन अधिकारी डॉ.शिवशक्ती पवार, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे,तालुक्यातील सर्व तालुका अधिकारी व वैद्यकीय अधिकारी इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!