(डॉ.प्रदीप राजपूत)
नांदेड महानगरपालिकेवर भाजपाचाच महापौर विराजमान व्हावा, या निर्धाराने भाजपा मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालय सुरू झाल्यापासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सलग अकरा दिवस चोवीस तास कार्यालयातच मुक्काम ठोकून कार्यरत राहिल्याबद्दल भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांचा भाजपा महानगराध्यक्ष अमर राजुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या काळात त्यांनी कार्यालयालाच आपले घर बनवत, क्षणोक्षणी बदलणाऱ्या राजकीय समीकरणांवर बारकाईने लक्ष ठेवत संपूर्ण प्रचार यंत्रणा अखंडपणे कार्यरत ठेवली. सत्कारानंतर दिलीप ठाकूर यांनी कार्यालयातून घराकडे सामान घेऊन कूच केली, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांत कृतज्ञतेची भावना स्पष्ट दिसून येत होती.*
यावेळच्या महानगरपालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, संघटन मंत्री संजय कोडगे, माजी मंत्री डी. पी. सावंत व महानगराध्यक्ष अमर राजुरकर यांनी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी दिलीप ठाकूर यांच्यावर सोपवली होती. बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांचे समन्वय, प्रचार साहित्याचे वितरण, बैठका, आढावे आणि रणनीती ठरविण्याचे काम त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले.
सन १९९५ पासून आतापर्यंत झालेल्या तब्बल नऊ लोकसभा व आठ विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पूर्णवेळ झोकून देत प्रचार यंत्रणा उभी केली आहे. या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर त्यांनी प्रत्येक निवडणुकीत नव्या पद्धतीने काम करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. अचूक रणनीती, काटेकोर नियोजन आणि दूरदृष्टीमुळेच दिलीप ठाकूर यांची ओळख ‘इलेक्शनचे मास्टरमाईंड’ म्हणून प्रस्थापित झाली आहे.
महानगरपालिका निवडणुकीदरम्यान त्यांच्या शिस्तबद्ध, नियोजनबद्ध व अहोरात्र सुरू असलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य देशमुख, प्रा. नंदू कुलकर्णी, बालाजी बच्चेवार, व्यंकटेश साठे, बालाजीराव शिंदे, महानगर सरचिटणीस शितल खांडील व विजय गंभीरे, सुरेश लोट, बागड्या यादव, सतीश बेरुळकर, कामाजी सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी दिलीप ठाकूर यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
